तेलवाडी फाट्यावर बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Foto
पैठण, (प्रतिनिधी): पैठण - शेवगाव मार्गावर धावणाऱ्या एसटी बसचालक व वाहकांकडून तेलवाडी फाट्यावर बस थांबा असताना बस थांबविण्यात येत नसल्याने परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. नियमित बससेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा - महाविद्यालयात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तेलवाडी फाटा हा परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा थांबा असून, येथून दररोज अनेक व विद्यार्थी शिक्षणासाठी पैठण शेवगाव येथील विविध ठिकाणी प्रवास करतात. मात्र पैठणशेवगाव आगाराच्या काही बस रिकाम्या जात असताना या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना बराच वेळ वाहनांची वाट पाहावी लागते. काही वेळा बस न मिळाल्याने त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
बस थांबविण्याची विनंती करूनही काही चालक वाहकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थी व प्रवाशांकडून करण्यात येत आहे. 

आयटीआय तसेच इतर व्यवसायिक शिक्षणासाठी सकाळी दहाची वेळ असते त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी शाळेत जावे लागते मात्र बस गाड्या फाट्यावर थांबत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत या संदर्भात  ालकांमध्येही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नियमितपणे बस थांबविण्याचे स्पष्ट आदेश देऊन विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व पालकांनी पैठण शेवगाव आगार प्रशासनाकडे केली आहे. आगार प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, नसता विद्यार्थ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी दिला आहे.